Tuesday, 12 July 2022

गुरुपौर्णिमा


 आई, वडील  आणि शिक्षकांप्रमाणे माणसाला जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंची देखील गरज असते. खरे गुरू तेच असतात जे शिष्याला त्याचे जीवन आणि संसार सुखाचा करण्यासाठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करतात. अशा गुरूंना शिष्य सदगुरूंचा मान देतात. मात्र आजकाल गुरू मार्ग दाखविण्याऐवजी व्यवहार करून शिष्यांची फसवणूक करतानाच जास्त दिसतात. त्याच प्रमाणे स्वतःजवळील अपूऱ्या ज्ञानातून शिष्याचा बुद्धीभेद करणारे गल्लाभरू गुरू गल्लोगल्ली निर्माण झाले आहेत. अशा प्रकारच्या गुरूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे खरे गुरू अथवा सदगुरू ओळखणे कठीण झाले आहे. यासाठी  शिष्याने गुरूची ओळख पटविण्यासाठी भोळसट भावापेक्षा तर्कशुद्ध बुद्धीचा वापर करावा.


गुरूचे कार्य

गुरूचे कार्य हे एक महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव  निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरूचे खरे कार्य असते. ज्ञान देताना गुरूची भावना ही अहंकाराची नसावी. या ज्ञानाने आपल्या शिष्याच्या जीवनाचे कल्याण होणार आहे अशी भावना गुरूकडे असावी. कारण जेव्हा गुरूने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरूला आनंद आणि समाधान झाले तरच तो खरा गुरू जाणावा. शिष्याला  जितकी गुरूची गरज असते तितकीच गुरूला देखील शिष्याची गरज असते. जर शिष्यच नसेल तर गुरू आपले ज्ञान कोणाला देणार. म्हणूनच गुरूने देखील आपल्या शिष्याबद्दल कृतज्ञ असावे.


शिष्याची वागणूक:-

गुरूकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्विकारतो त्या शिष्याला गुरूकडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते. कारण ज्ञान ग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा नसेल तर गुरूकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असूनही शिष्याला समजावणे गुरूला कठीण जाते. कारण ज्ञानप्राप्तीमध्ये शिष्याचा अंहकार अडथळा निर्माण करत असतो. यासाठीच शिष्याची गुरूवर मनापासून श्रद्धा असणं गरजेचं आहे. त्याचसोबत गुरूकडून मिळवलेलं ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा शिष्याने तंतोतंत प्रयत्न करणे देखील गरजेचे आहे. असे केल्यास शिष्याच्या पाठी गुरूच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याची आयुष्यात प्रगती होत जाते.

गुरूपौर्णिमा:-

आपल्या भारत भुमीत गुरू शिष्य परंपरा फार प्राचीन काळापासुन चालत आलेली आहे. शिष्य अध्ययनाकरीता गुरूजवळ येतो आणि गरू हातचे न राखता शिष्याला अध्ययना सोबतच जिवनाच्या वाटचालीतले दर्शन घडवुन शिष्याला घडवतो. एक कुंभार ज्याप्रमाणे सुबक रितीने मातीचे मडके घडवतो अगदी त्याच तऱ्हेने गुरू चांगल्या वाईट गोष्टींची पारख घडवुन अत्यंत परिश्रमाने शिष्याला घडवतो. या गुरूला काही अंशी उतराई होण्याची संधी शिष्याला मिळावी त्याकरीता ’’गुरूपौर्णिमा ’’ हा दिवस निर्मीलेला आहे.


गुरूपौर्णिमेचे महत्त्व – Importance of Guru Purnima   

गुरूपौर्णिमा यालाच व्यासपौर्णिमा (Vyasa Purnima) असे देखील म्हंटल्या जाते. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस संपन्न होतो.


“गुरू थोर म्हणावा की देव थोर म्हणावा

नमस्कार आधी कुणासी करावा?

मला वाटते की गुरू थोर आहे

तयाचीये योगे रघुनाथ पाहे… "

भक्ताला परमेश्वराची ओळख गुरूमुळेचे होते त्यामुळे परमेश्वर आणि गुरू यांपैकी आधी नमस्कार कुणाला करावा हा प्रश्नं जर पडला तर आधी गुरूला नमस्कार करावा…

गुरूपौर्णिमेला व्यासपुजा करण्याची पध्दत आहे. महर्षी व्यासांनी महाभारतासारखा अलौकिक आणि सर्वात श्रेष्ठ असा ग्रंथ लिहीला. महाभारत सामान्य माणसाला धर्मशास्त्र, नितीशास्त्र, व्यवहारशास्त्र, आणि मानसशास्त्राची देखील ओळख करून देतो. अश्या महान आणि श्रेष्ठ ग्रंथाची निर्मीती करणारे महर्षी व्यास. त्यांच्या ऐवढा महान गुरू अद्याप झाला नाही, त्यांच्या श्रेष्ठत्वाची पुजा करण्याचा हा गुरूपौर्णिमेचा दिवस व्यासपौर्णिमा म्हणुन देखील ओळखला जातो

भारतीय संस्कृतीचे मुलाधार आणि शिल्पकार महर्षी व्यासांना समजले जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्यावेळी ’ज्ञानेश्वरी ’ लिहीण्यास सुरूवात केली त्यावेळी सुरूवातीलाच ’व्यासांचा मागोवा घेतु’ असा उल्लेख करून व्यासांच्या श्रेष्ठत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आपल्याला पहायला मिळते.

कृष्ण सुदामा यांना सांदिपनी ऋषींनी घडवले, त्याचप्रमाणे इतर प्रसिध्द गुरू शिष्य जोडयांमधे राम लक्ष्मण – विश्वामित्र, परशुराम – कर्ण, अर्जुन – द्रोणाचार्य, जनक – याज्ञवल्क्य, शुक्राचार्य – जनक, अश्या गुरूशिष्य जोडया आपल्याला पहायला मिळतात.

भगवंत श्रीकृष्णांनी सांदिपनी ऋषींच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी आपले थोरले बंधु निवृत्तीनाथांनाच गुरू मानले, तर संत नामदेवांचे गुरू होते विसोबा खेचर… या गुरूपरंपेला पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की भारतीय परंपरेने गुरूला कायमच पुजनीय मानले आहे.


अश्या या गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण गुरूपौर्णिमेला गुरूचरणी नतमस्तक होत आदर व्यक्त करतो. पौर्णिमा म्हणजे प्रकाश ! गुरू नित्य शिष्याला ज्ञानाचे ज्ञानामृत पाजुन घडवत असतात अश्या गुरूची प्रार्थना करण्याचा हा दिवस…..


आपली सर्वात पहिली गुरू म्हणजे आपली आई ! चांगले काय? वाईट काय याची जाणीव ती सर्वप्रथम आपल्याला करून देते आणि म्हणुन ती आपली गुरू ठरते. पुढे अध्ययनाच्या रूपाने नव्या गुरूशी आपला परिचय होतो आणि आपण घडत जातो. ही गुरू शिष्य परंपरा आपल्याला भारता व्यतिरीक्त इतर कुठेही पहायला मिळत नाही. या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की आपण किती महान देशात जन्म घेतला आहे.


गुरू हा ज्ञानाचा सागर आहे. शिष्याने विनम्र भाव अंगी बाणवल्याशिवाय या गुरूरूपी सागरातील जल त्याला प्राप्त करता येणार नाही त्यामुळे शिष्याने नेहमी विनम्र असावे. जीवन जगत असतांना प्रत्येक वळणावर आपल्याला नवनवीन माणसे भेटतात. त्यांच्याकडुन आपल्याला नविन काहीतरी शिकायला मिळतं. ज्यांच्याकडुन चांगले काहीतरी आपल्याला शिकायला मिळाले ते आपले गुरूच!


गुरूब्रम्हा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः।

गुरूसाक्षात् परंब्रम्ह तस्मै श्रीगुरूवे नमः।।


आयुष्य जगत असतांना आपल्याला गुरूने शिकवीलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवावयास हवे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातुन हस्तांतरीत करायला हवे. हीच आपल्या गुरूचरणी आपली खरी गुरूदक्षिणा ठरेल!


तर आपल्याला चांगले वाईट शिकवणाऱ्या माता-पित्यास, गुरुजन वर्गाला या लेखाला गुरुदक्षिणा म्हणून समर्पित करतो आणि या लेखाची सांगता करतो, आज आपण जे काही आहोत ते त्यांच्या मुळेच म्हणून त्या सर्व जीवन जगायला शिकवणाऱ्या शिक्षकांना विनम्र अभिवादन.

🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

प्रवोशोत्सव शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा

  शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा. पी.ई.सोसायटी संचलित शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे आज दि.१६/०६/२०२५, वार-सोमवार रोज...