Friday, 4 December 2020

जागतिक मृदा दिवस

 

जागतिक माती दिवस (५ डिसेंबर)




जागतिक माती दिवस (५ डिसेंबर)
माती...
सर्वाचा जिव्हाळ्याचा विषय...
          कारण लहानपणी माती खाऊनच तर सारे मोठे झालेत... मातीचा गंध, मातीची चव, मातीचा स्पर्श अन मातीतील ऊब सारं काही विलक्षणीय... मनाला आतून स्पर्श करून जाणारे... अनवाणी पायाने मातीत राबताना, ओंजळीत माती घेऊन तिला पाहताना, पाहत पाहत तिला स्मित हास्य करून खाली जमिनीवर वाहताना नक्की किती आनंद मिळतो हे एका शेतकऱ्यालाच विचारावं... तापलेल्या धरतीवर जेंव्हा पाऊस मनसोक्त बरसतो, तेंव्हा मातीच्या सुगंधातूनच धरतीचा आनंद व्यक्त होत असतो... मातीला फक्त घट्ट पकडण माहीत आहे. झाडांना ती असंच घट्ट पकडून ठेवते. हृदयाशी कवटाळून ठेवते.  त्याची मुळे तिच्या काळजात रुततात, टोचतात तरीही त्यांना ती सोडत नाही. जशी आई आपल्या लेकराला सोडत नाही... माती सारं काही देत जाते इतरांना. अगदी जीवन ही देते, कारण मातीतूनच नवीन जीवाचा (पिकाचा) जन्म होतो. पण तिला मात्र अपेक्षा असते तर ती फक्त आपल्या कष्टाच्या घामाची... मातीमुळेच तर खऱ्या अर्थाने धरणीला "धरणी माय, काळी आई" अस संबोधले जाते... माती म्हणजे जमिनीची त्वचा जणू...
          पण आजकाल आपण रासायनिक खतांच प्रमाण इतकं वाढवलंय की मातीचा गंध, सुपीकता सारं काही ढासळत चाललंय. तरीही त्याची कुणाला जाणीव नाही. झाडे तोडल्यानेही जमिनीची धूप होतेय. माती नष्ट होतेय. तरीही आपलं वागणं अजून निष्काळजीपणाचच? चंद्रावर जावा, मंगळावर जावा नाहीतर सूर्यावर जावा पोटाला चार घास तरी खायला लागणारच आहे. अन्न हवं तर शेती व शेतकरी ही हवा आणि शेती करायची म्हंटल की जमीन (माती) हवी. त्यासाठी माती जपणं गरजेचे आहे.
          आपलं शरीर हे नाशवंत आहे. ते मातीपासून बनलंय आणि शेवटी मातीतच विरून जाणार... मातीतून आलेला मातीतच जाणार, हे जरी खरं असलं तरी कुणाच्या आयुष्याची कधीच माती होऊ नये हेही तितकंच खरं आहे...
जागतिक माती दिनानिमित्त फक्त एकच सांगणं..., "मातीच मातीपण टिकवून ठेवा, तिच्यातली सुपीकता ढासळू देऊ नका..."
- खलिपे अश्विनी श्रीकांत शोभा, तोंडोली.

No comments:

Post a Comment

प्रवोशोत्सव शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा

  शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा. पी.ई.सोसायटी संचलित शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे आज दि.१६/०६/२०२५, वार-सोमवार रोज...